रायगड -जगभरात सध्या कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रायगड जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून जिल्ह्यातील चाकरमानी, परराज्यात अडकलेले नागरिक हे जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांना प्रशासनाने स्वतः च्या आणि जनतेच्या आरोग्य दृष्टीने होम क्वारंटाईन केले आहे. मात्र, त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये होम क्वारंटाईन व्यक्तीपासून आपल्याला कोरोनाची लागण होईल, अशी भीती निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रकार घडत आहेत. याबाबत प्रशासनाने आधी होम क्वारंटाईनबाबत जनतेत जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा समाजातील एकोपा तुटण्याची भीती या कोरोनामुळे निर्माण झाली आहे.
कोरोना विषाणू संक्रमण हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करून त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात. रिपोर्ट येईपर्यत त्यांना होम-क्वारंटाइन केले जाते. निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरही पुढे चौदा दिवस त्यांना क्वारंटाइन केले जाते. एखाद्या व्यक्तीला अथवा कुटुंबाला बाहेरून आला असेल तर होम-क्वारंटाइन केले जाते. कारण त्याला कोरोनाची लागण झाली असेल तर तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी होम क्वारंटाईन केले जाते. मात्र, होम क्वारंटाइन केले म्हणजे तो कोरोनाबाधित आहे, असा अर्थ होत नाही. त्याला लागण झाली असेल तरच तो व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न होते.