रायगड- चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव हे पक्षातच राहतील, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी बोलून दाखविला. पुतणे संदीप तटकरे, आमदार अवधूत तटकरे, भाऊ अनिल तटकरे हे पक्षात राहतील. मात्र, त्यांचा निर्णय घेण्यास ते सक्षम असल्याचेही सूचक उत्तर खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
अलिबाग येथे जिल्हा नियोजन भवनात बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे आले असता बैठकीनंतर त्यांनी तुषार विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार होऊन शंभर दिवस पूर्ण झाले. रायगडच्या विकासाबाबत संसदेत मांडलेल्या प्रश्नाबाबत तटकरे यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यावेळी आमदार भास्कर जाधव, अवधूत तटकरे, अनिल तटकरे, संदीप तटकरे यांच्या मातोश्री भेटीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले.चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, श्रीवर्धनचे आमदार पुतणे अवधूत तटकरे, माजी आमदार व बंधू अनिल तटकरे, संदिप तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत आपली भूमिका काय? असा प्रश्न विचारला असता, भास्कर जाधव हे जेष्ठ, जुने जाणते नेते आहेत. शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मात्र, पक्ष बदलण्याबाबत कोणतीही भूमिका घेणार नाहीत, असेही जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहतील, असा ठाम विश्वास आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. अवधूत तटकरे, अनिल तटकरे, संदिप तटकरे हे मातोश्रीवर गेले असल्याचे समजले आहे. मात्र, पक्ष बदलाचा निर्णय ते नंतर घेणार आहेत, असे समजते. त्यामुळे ते पक्ष बदलणार नाहीत. मात्र, निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत, असे सूचक उत्तरही सुनील तटकरे यांनी दिले.