रायगड - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून नागरिकांमधून पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यातच जिल्ह्यातील खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींनीही लॉकडाऊनचा आग्रह धरला. त्यानुसार 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैच्या माध्यरात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली. मात्र आता यावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच लॉकडाऊन हटवण्याची मागणी होत असून प्रशासनाला आता रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी सुरू होण्याआधीच पुन्हा लॉकडाऊन नको, असा सूर उमटत आहे.
दिल्ह्यातील लॉकडाऊन हटवण्याची मागणी होत असून प्रशासनाला आता रोषाला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तूची दुकाने बंद करण्यात येणार असून काही कंपन्या सुरू राहणार असल्याने त्यावरही आता टीका होऊ लागली आहे. जिल्ह्यातील कंपन्या ह्या 100 टक्के बंद करा, अशी मागणी माजी आमदार माणिक जगताप, शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनामुळे तीन महिने आमचा वडा पाव व्यवसाय बंद होता. शासनाने शिथिलता आणल्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरू झाला. आधीच्या लॉक डाऊन काळात आमची आर्थिक स्थिती बिकट झाली असताना आता सावरत असताना पुन्हा लॉक डाऊनची टांगती तलवार उभी राहिल्याने हातावर कामवणाऱ्या आमच्या सारख्याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे होते. अशी प्रतिक्रिया व्यवसायिक लक्ष्मण राठोड यांनी दिली. लॉकडाऊन हा उपाय नसून पुढचे दिवस हे सणासुदीचे आहेत. अशा काळात केलेले लॉकडाऊन चुकीचे आहे. टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर आताच अनेकांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला आहे. पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याने काय खायचे, असा प्रश्न सतीश चेवले यांनी उपस्थित केलाय.