रायगड - तब्बल 22 तासांच्या खोळंब्यानंतर कल्याणहून बदलापूरसाठी पाहिली लोकल धावली. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण ते कर्जत मार्गावरील रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्यातच मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली. त्यामुळे कल्याण ते बदलापूर आणि बदलापूर ते कल्याण या मार्गावरील लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. पण काही वेळापूर्वी कल्याण ते बदलापूर मार्गावरील लोकल सुरू करण्यात आल्या आहेत.
मुंबई उपनगरामध्ये 25 जुलैपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बदलापूर स्थानकाचे रुळ जलमय झाले होते. परिणामी रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत/ खोपोली मार्गावरीस सेवा स्थगित केली होती.