रायगड- कोणीही मनातले मांडे खाऊ नये, स्वप्न पाहू नये, महाराष्ट्रातील सरकार किमान समान कार्यक्रमावर चालत आहे. एखादा नेता एका व्यक्तीविषयी काय बोलतो यावर सरकार टिकणार नाही. राज्यातील सरकार हे अन्न, वस्त्र निवारा, सामाजिक न्याय, आरोग्य, रोजगार, शिक्षा या विषयावर काम करत आहे. सावरकर यांचा विषय वेगळा आहे. भाजपला सावरकरांचा पुळका येणे हे ढोंग आहे, अशी टीका भाजपवर खासदार संजय राऊत यांनी केली.
अलिबाग येथील आगरसुरे या त्यांच्या मूळगावी आले असता ते पत्रकारांशी संवाद साधत होते. खासदार राऊत पुढे म्हणाले, साडेपाचवर्षे केंद्रात भाजपची सत्ता आहे. मी स्वतः पहिल्या दिवसापासून सावकरांना भारतरत्न मिळावे, अशी मागणी करत आहे. मुंबईतील सावरकरांचे स्मारक हे बाळासाहेब ठाकरेंच्या प्रयत्नाने तयार झाले आहे.
त्यांना अजित पवारांबाबत विचारले असता ते म्हणाले, हे सरकार पाच वर्षे अजित पवारच टिकवतील आणि ते मुख्यमंत्र्यांचे खंदे सहकारी म्हणून काम करतील. त्यांना राज्यातील प्रश्नांची जाण आहे. हे सरकार यशस्वी होऊन यशात मुख्यमंत्र्याबरोबर अजित पवार यांचे योगदान महत्वाचे राहिल, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.
जीएसटी परताव्याच्या पैशावर पाकिटमारी करू नका
केंद्र सरकारने जीएसटीचे 15 हजार 500 कोटी परतावा राज्य सरकारला दिला नाही. यामुले राज्याला आर्थिक चणचण भासत आहे. हे राज्याचे पैसे असून जर पैसे मिळाले नाही तर राज्यातील शेतकऱ्याच्या तोंडचा हक्काचा घास हिरावला आहे, अशी आमची भूमिका राहील. केंद्र सरकारने घीसाड घाईने निर्णय घेतल्याने त्याचा त्रास इतर राज्याला सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या 15 हजार 500 कोटीसह पंजाबला साडेतीन हजार कोटी, केरळला 2 हजार 600 कोटी देणे लागते. अनेक लहान राज्यांना या रकमा महत्वाच्या आहेत. 4 महिन्यांपासून केंद्राने हा परतावा दिलेला नाही आणि केंद्रात मौजमजा सुरू आहे. राज्यांना पैसे देणे महत्वाचे असताना त्यामध्ये पाकिटमारी करू नका, असा टोला केंद्र सरकारला खासदार संजय राऊत यांनी मारला आहे.