रायगड - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने, शिवसेनेला विजयासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. मावळमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे संभाव्य उमेदवार आहेत. राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात जोरदार चुरस होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मावळ मतदारसंघ हा २००८ मध्ये तयार झाला असून २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर हे निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे शिवसेनेचा गड काबीज करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाला रायगडचे उरण, पनवेल, कर्जत खालापूर, तर पुणे मतदारसंघातील मावळ, चिंचवड, पिंपरी असे ६ विधानसभा मतदारसंघ जोडले आहेत. उरण मनोहर भोईर (शिवसेना), पनवेल प्रशांत ठाकूर (भाजप), कर्जत खालापूर सुरेश लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), मावळ बाळा भेगडे (भाजप), चिंचवड (लक्ष्मण जगताप), पिंपरी गौतम चाबूस्वार (शिवसेना) असे विधानसभा निहाय बलाबल आहे. मावळ मतदार संघात शिवसेनेचे 2, भाजप 3, तर राष्ट्रवादीचा १ आमदार आहे. त्यामुळे युतीचे पारडे या मतदारसंघात जड आहे.
शेकापची पनवेल, उरण, खालापूर या विधानसभा मतदारसंघात निर्णायक मते असल्यामुळे त्याचा फायदा आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मिळू शकतो. तसेच चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात कटुता असल्याने त्याचा फटका युतीच्या उमेदवाराला होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसची कर्जत - खालापूर मतदार संघ सोडला तर इतर मतदारसंघात ताकद कमी झाली आहे. तसेच काँग्रेस पक्षाचीही ताकद या मतदारसंघात कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मतांची बेरीज करताना कसरत करावी लागणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेकडे आहे. मात्र, पार्थ पवार यांच्या स्वरुपाने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी सुरुंग लावणार की पुन्हा शिवसेना मावळचा गड राखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २००९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्यांना अद्याप यश मिळाले नाही. त्यामुळे पार्थ पवारांच्या रूपाने मावळ लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न पूर्ण होणार की अपूर्ण राहणार हे २५ मे ला कळणार आहे.