रायगड -अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्र किनारी निसर्गाच्या सानिध्यात 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 11 आणि 12 जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात पक्षी संवर्धनासाठी पक्षीमित्र काय केले पाहिजे याबाबत चर्चा करतील. राज्यातील देशातील पक्षीमित्र त्यावर काय उपाय करणे गरजेचे आहे, हे ठरवतील. हाच या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात पहिल्यांदाच पक्षीमित्र संमेलन होत असल्याचे आयोजक रुपाली मढवी यांनी यावेळी सांगितले.
33 वे महाराष्ट्र पक्षीप्रेमी संमेलन आजपासून रेवदंडा येथे सुरू अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, प्राणीमित्र संघटना अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत वडतकर, मावळते अध्यक्ष किशोर रिठे, संमेलनाध्यक्ष डॉ. राजू कसंबे, आयोजक रुपाली मढवी याच्यासह पक्षीमित्र मोठ्या संख्येने उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. संमेलनाच्या उद्घाटनानंतर पक्षीमित्र पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पक्षीमित्रांनी पक्षावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात राज्यतून 300 हुन अधिक पक्षीप्रेमी यात सहभागी झाले आहेत. धुळे येथून सायकलवर पक्षीमित्र संमेलनात दाखल झाले आहेत. संमेलनात निवडक पक्षाचे अप्रतिम फोटो प्रदर्शन पक्षीप्रेमींना बघण्यास ठेवले आहे. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणमुळे पक्षाचा मूळ अधिवास हरवत चालला आहे. मानवाचे पक्षाच्या आधिवासावर आक्रमण केले आहे. पक्षी हे निसर्गचक्र राखण्याचे काम करत आहेत. मात्र त्याचेच अस्तित्व धोक्यात आलेले आहे. पक्षीमित्र संमेलनातून पक्षाच्या संवर्धन आणि संरक्षणा बाबत चर्चा, परिसंवाद, मुलाखती याची मेजवानी पक्षीमित्र आणि प्रेमींना मिळणार आहे. संमेलनात फोटो प्रदर्शन ठेवण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. या संमेलनात वन विभागाचाही महत्वाचा सहभाग राहणार आहे.
महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन हे दोन दिवस असून यामध्ये पक्षीमित्रासह विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घेऊन पक्षाच्या संवर्धन आणि संरक्षणा बाबत माहिती तज्ज्ञांकडून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून पक्षी आपल्या जीवनात किती महत्वाचे काम करतात याकडे नागरिकांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.