रायगड - श्रीवर्धनची विधानसभा निवडणूक सुनील तटकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. शिवसेनेने विनोद घोसाळकर यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील सर्व विभाग पिंजून काढला होता. काँग्रेस मधील बंडखोरांना शिवसेनेने बळ पुरवले होते. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. एका बाजूला अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणुकीत रंगत आणली होती. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांच्या प्रचारसाठी संपुर्ण कुटुंब मैदानात उतरले होते.
हेही वाचा... मनसेचं आता काय होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार यंत्रणा उभी करताना अतिशय उत्तम नियोजन केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे बलस्थान व शिवसेनेच्या बलस्थानाचा उत्तम पद्धतीने अभ्यास करण्यात राष्ट्रवादीचा अभ्यास गट यशस्वी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चक्रव्यूह आखणीनुसार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेची ताकद असलेल्या मुबंई स्थीत मतदारांच्या गाठीभेटींना प्राधान्य दिले. त्यामुळे शिवसेनेची ताकद असलेल्या मुंबईकर मतदात्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे वळते केले. त्याचवेळी सुनिल तटकरे यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा उपयोग करून विरोधी पक्षांतील नाराज कार्यकत्यांना राष्ट्रवादीमध्ये सामावून घेतले. त्याचबरोबर शिवसेनेच्या मित्रपक्षांची देखील मनधरणी करून आपल्या बाजूला वळवल्याचे दिसत आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांना ही निवडणूक अगदी सहज जिंकता आली आहे.