रायगड - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सगळीकडे सुरू आहे. रायगड जिल्ह्यात लसीच्या तुटवढ्यामुळे अनेक नागरिक आजही लसीकरणापासून वंचित आहेत. अलिबाग तालुक्यातील धोकावडे, सातिर्जे गावातील ग्रामस्थही लसीपासून वंचित राहिले आहेत. यासाठी धोकावडे ग्रामपंचायत आणि मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत दोन्ही गावातील 2300 ग्रामस्थांना एकाच दिवशी लस देण्यात आली. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन गावात जम्बो लसीकरण करण्यात आले आहे.
अलिबागमध्ये लसीचा तुटवठा
अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र, तालुक्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने येणारा लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन पहाटेपासून रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र, नागरिकांची गर्दी पाहता अनेक नागरिक लसीपासून वंचित राहत आहेत. कोरोना आजारावर लस फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे लस मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे.
शिना कटारियांच्या पुढाकारातून 1200 जणांचे लसीकरण
धोकावडे ग्रामपंचायत हद्दीतील आणि सातिर्जे गावातील नागरिकही लसीपासून वंचित राहिले आहेत. धोकावडे-सातिर्जे परिसरात अनेक मोठ्या उद्योजकांचे बंगले आहेत. शिना कटारिया आणि त्याची मुलगी नंदिनी कटारिया या धोकावडे गावाच्या रहिवासी आहेत. गावातील ग्रामस्थ लसीपासून वंचित असल्याचे कटारिया यांना समजले. कटारिया यांनी धोकावडे ग्रामपंचायत सरपंचाला संपर्क करून लस आम्ही उपलब्ध करून देतो, असे सांगितले. त्यानुसार गावातील बंगले धारकांना नंदिनीने मेसेज टाकून मदतीचे आवाहन केले. नंदिनीच्या आवाहनातून 11 लाख रुपये जमा झाले. त्यातून अपोलो रुग्णालयाकडून 1200 लसीचे डोस उपलब्ध करण्यात आले. त्यानुसार गावातील 1200 ग्रामस्थांचे आरोग्य विभाग, अपोलो रुग्णालय आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लसीकरण करण्यात आले. याबाबतची माहिती धोकावडे ग्रामपंचायत सरपंच जयश्री म्हात्रे यांनी दिली आहे.