रायगड - पेण-खोपोली रस्त्यावर दरोडा टाकून पळालेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. पेण पोलिसांनी दरोडा प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून 40 लाख 98 हजार 788 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील 3 आरोपी फरार असून त्यांचा तपास पेण पोलीस करीत आहेत. पकडलेल्या आरोपींना पेण न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पेण दरोडा प्रकरणातील तपासाबाबत अलिबाग जिल्हा पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी कारवाईविषयी माहिती दिली.
14 सप्टेंबर रोजी सुप्रीम कंपनीतून चंद्रकांत गुंगे हे 25 लाख 77 हजार 288 रुपये किमतीचा प्लास्टिक दाण्याचा माल घेऊन ट्रेकद्वारे (केए 56/ 3438) नागोठणे येथून चेन्नईकडे निघाले होते. पेण-खोपोली रस्त्यावर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गागोदे खिंड येथे ट्रक आला असता, सात ते आठ जणांनी आपली झायलो कार ट्रकच्या पुढे आडवी घालून ट्रक अडवला. त्यानंतर आरोपींनी ट्रकमध्ये घुसून फिर्यादी आणि दोन साक्षीदार याना मारहाण करून ट्रक ताब्यात घेतला. आरोपींनी झायलो कारमध्ये चालक आणि साक्षीदारांना कोंबून त्यांचा मोबाईल, पैसे घेऊन दोन तीन तासांनी फिरवून इरवाडी पेट्रोल पंपाजवळील गवतात फेकून देऊन पसार झाले. या घटनेबाबत गुंगे यांनी पेण पोलीस ठाण्यात झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला.