रायगड- एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय, कोलकाता येथे ११ जूनला सुमारे २०० जणांच्या जमावाने उपस्थित डॉक्टर व इंटर्नवरती सशस्त्र हल्ला केला. त्यामध्ये अनेक डॉक्टर्स गंभीर जखमी झाले. तर डॉक्टर मुखर्जी यांच्या डोक्याला अत्यंत गंभीर इजा झाल्यामुळे ते कोमात आहेत. या घटनेचा आयएमए अलिबागच्या डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध केला. तसेच यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्याबाबत आयएमए अलिबागच्या डॉक्टरांकडून निषेध डॉक्टरांवर जमावाकडून हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ही अत्यंत चिंतेची व निंदनीय बाब आहे. आजकाल वैद्यकीय व्यावसायिक आणि रूग्णालय यावर हिंसाचार वाढत आहे. आयएमएने वेळोवेळी या विरुद्ध आवाज उठविला आहे. डॉक्टरांवर झालेल्या या हल्ल्याबाबत शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. देशभरात सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तसेच जागोजागी धरणे धरतील, असे आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अलिबाग शहरातील आयएमएचे डॉक्टर यांनीही काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांना निषेधाचे व मागण्याचे निवेदन दिले. केंद्र शासनाने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणाऱ्या हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करावे आणि आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. वर्ल्ड मेडिकल असोसिएशननेदेखील आयएमएला पाठिंबा दिला असून सर्व सदस्य देशांनी असा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने कडक कायदे करावेत, अशी मागणी एका ठरावाद्वारे केली आहे.
वारंवार होणार्या अशा हल्ल्यांचा इंडियन मेडिकल असोसिएशन, अलिबाग शाखा तीव्र निषेध करते. तसेच असे हिंसक हल्ले भविष्यात होऊ नये, त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला आवाहन करण्यात आल्याचे अध्यक्ष राजेंद्र चांदोरकर यांनी म्हटले. यावेळी डॉ. संजीव शेटकर, डॉ धामणकर, डॉ वाझे, डॉ. घाटे आदी डॉक्टर उपस्थित होते.