पनवेल- पनवेलमध्ये सकाळपासून पावसाच्या धुमाकुळीमुळे पनवेलकरांचे चांगलेच हाल झाले. रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढल्याने जागोजागी पाणी साचल्याने रस्त्यांवर अक्षरशः ओढा वाहत असल्याचे भासत आहे. मुसळधार पावसामुळे पनवेल पाण्याखाली गेले आहे. पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे सुरुवातीच्या पावसानेच पनवेल महापालिकच्या नालेसफाईचा पर्दाफाश केला.
गेल्या महिनाभरापासून उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मुसळधार पाऊस पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीसाठी चांगला असला तरी पावसामुळे पाणी साचले होते. नेहमीप्रमाणे पनवेल शहरात पायोनियर सोसायटी, तालुका पोलीस ठाणे या भागात तर, कळंबोलीतील मुख्य रस्त्यावर श्री अपार्टमेंट, करावली चौक या भागातही पाणी साचले आहे. कळंबोलीतील बैठ्या घरांत काही ठिकाणी दारापर्यंत पाणी साचले आहे. तसेच गावदेवी पाड्यावरील बैठ्या घरात देखील पाणी शिरल्याने इथल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काहींच्या घरात तर किचनपर्यंत पाणी शिरल्याने हलवाहलवी करावी लागली. घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यात ही सर्व मंडळी व्यस्त होती. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याचे वेळापत्रकही कोलमडले.