रायगड - जिल्ह्यात येत्या 72 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, भोगावती या नद्यांनी धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने पुन्हा 1989 ला आलेल्या पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने व आपत्ती प्रशासनाकडून नदी किनारी व समुद्र किनारी गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची 'बॅटिंग' सुरूच - उल्हास
जिल्ह्यात येत्या 72 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्हा प्रशासनाने व आपत्ती प्रशासनाकडून नदी किनारी व समुद्र किनारी गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रात्रभर पावसाने थैमान घातले आहे. पावसाबरोबर वादळी वारे वाहत असल्याने झाडे, घरे पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात तसेच सखल भागात पाणी साचले आहे. नागोठणे, रोहा, महाड, पेण, अलिबाग, पाली, पोलादपूर या तालुक्यातील गावामध्ये, शहरात, बाजारपेठेत, घरात पाणी घुसल्याने नागरिकांनी रात्री जागून काढल्या. तर पावसाचा जोर व वादळी वारा सुटला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पेण तालुक्यातील भोगवती नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अंतोरे गावात पाणी घुसल्याने 35 ते 40 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर अलिबाग तालुक्यातील रामराज येथील नदीला पूर आल्याने पूर्ण गाव पाण्याखाली आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी रात्र जागून काढली आहे. तर अनेकांना सुरक्षस्थळी हलविण्यात आले आहे. नागोठणे, महाड याठिकाणीही पाणी घुसले असल्याने पूरपरिस्थिति निर्माण झाली आहे.
मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरमय परिस्थिती निर्माण होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आंबेत पूल पडला असल्याबाबत काही अफवा पसरल्या असून ही बाब खरी नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. तर अतिवृष्टी असल्याने नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.