ठाणे - दोन दिवसांपासून उरण तालुक्यासह पनवेलमध्ये अक्षरशः पावसाने थैमान घातले आहे. इथल्या रस्त्यांना चक्क नद्यांचे स्वरूप आले आहे. ब्रेक न घेता पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. इथल्या नागरिकांच्या घरामध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे हाल होत आहेत.
उरणसह पनवेल शहराला पावसाने झोडपले, वाहतुकीची कोंडी - उरण बातमी
उरणसह पनवेल शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक मार्गांवर पाणी आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
जेएनपीटी ते दास्तान फाटा, गव्हाण फाटा हायवेवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या बसेसची चाके पाण्यात गेलेली आहेत. हायवेवर बसच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. त्याचा परिणाम अंतर्गत मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. या कोंडीत नोकरदार वर्गाची वाहने अडकून पडली होती. पुलाखाली वाहणारे पाणी व या पाण्याच्या डोहात बुडालेला रस्ता आणि त्यातून गाडी नेण्याचे धाडस करणारे वाहनचालक हे सर्व चित्र पाहता धडकी भरत आहे.
उरण आणि पनवेल परिसरात पावासाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने काही ठिकाणी चिखल झालाय. अनेक गाव पाण्यात आणि चिखलात गेली आहेत. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.