रायगड- निसर्ग चक्रीवादळ संकटाने जिल्ह्याला उद्ध्वस्त केले असताना पुन्हा एकदा कोरोना संकटाने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात कोरोनाने तीन हजारांचा आकडा गाठला असून 120 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 1953 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा कहर.. जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या परिस्थितीला हाताळण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यलयात पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.
जिल्ह्यात कोरोनाची संख्या गेल्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारी 170 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यासह ग्रामीण भागातही कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 76 झाली आहे. यातील 1953 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 1 एक हजार 3 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पेण, खोपोली या नगरपालिका हद्दीत वाढत्या कोरोना संख्येमुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी संचारबंदी लागू केली आहे.