महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येत्या २५ जूनपूर्वी पनवेल उपजिल्हा रुग्णालय सुरू करा; पालकमंत्री रवींद्र चव्हाणांचे आदेश - सार्वजनिक बांधकाम मंत्री

पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयाची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी येत्या २५ जूनपूर्वी हे उपजिल्हा रुग्णालय सुरू करा, असा आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पनवेल उपजिल्हा रूग्णालयाची पाहणी केली

By

Published : Jun 13, 2019, 2:04 PM IST

Updated : Jun 13, 2019, 5:07 PM IST

पनवेल- पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयाची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी येत्या २५ जूनपूर्वी हे उपजिल्हा रुग्णालय सुरू करा, असा आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. त्यामुळे मागील ८ वर्षांपासून सुरू असलेल्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या कामासाठी आणखी नवी डेडलाईन मिळाली आहे.

येत्या २५ जूनपूर्वी पनवेल उपजिल्हा रुग्णालय सुरू करा

पनवेल परिसरात एकही सरकारी रुग्णालय नाही. मुंबई-गोवा, मुंबई-पुणे द्रूतगती, जेएनपीटी-ठाणे, शीव-पनवेल हे महामार्ग पनवेलहून जातात. कोकणातून मुंबईला येताना तसेच पुण्याहून मुंबईला जाताना मोठे अपघात घडल्यास एकही ट्रामा सेंटर नाही. त्यामुळे पनवेल येथे मोठे रुग्णालय असावे, अशी मागणी २००८ पासून करण्यात येत होती.

सुरुवातीला शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण त्यानंतर माजी आमदार विवेक पाटील व त्याचसोबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुग्णालयाची मागणी लावून धरली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केल्यानंतर १० फेब्रुवारी २००९ मध्ये ३० खाटांच्या इमारतीला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. आघाडीच्या काळात आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.

परंतु, त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ३० ऐवजी १०० खाटांची इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी लाऊन धरली. त्यानंतर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी हे रुग्णालय १०० खाटांचे असेल व २० खाटांचे ट्रॉमासेंटर असेल, अशी घोषणा केली. त्यामुळे ३० खाटांच्या ऐवजी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला १२० खाटांच्या रुग्णालयाचा नवीन प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवावा लागला.

मात्र, वेळोवेळी निधीची कमतरता भासू लागली. निधीच नसल्यामुळे कंत्राटदाराला तरी कशा विनवण्या करणार, असा पेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला. यासाठी ३ कोटीचा आराखडा वजा करून अतिरिक्त १३ कोटी ८३ लाख ९८ हजारच्या अंदाज पत्रकाला आरोग्य विभागाकडून मान्यता देखील मिळाली.

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाच्या सध्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे स्वतः याठिकाणी आले. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या रखडलेल्या कामाबद्दल येथील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हे काम रखडले असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालकमंत्र्यांना दिली. त्यामुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे दरवाजे, शौचालय, सफाई, लादी पॉलिश आणि इतर कामे येत्या १५ दिवसांत पूर्ण करून लवकरात लवकर ही इमारत आरोग्य विभागाच्या हवाली करा, अशी तंबी कार्यकारी अभियंता सतीश श्रावदे यांना दिली.

तर १७ जूनपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक बैठक घेऊन उरलेल्या कामांना मंजूरी घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे लवकरच पनवेल उपजिल्हा रुग्णालय पनवेलकरांच्या सेवेत दाखल होणार, अशी माहिती यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष शत्रूघ्न काकडे, नगरसेवक नितीन पाटील, संतोष शेट्टी, आरोग्य खात्याच्या उपसंचालिका गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, पनवेलचे वैद्यकीय अधीक्षक नागनाथ एमपल्ले उपस्थित होते.

Last Updated : Jun 13, 2019, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details