रायगड -फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन फसवणूक झाल्याच्या घटना दिवसागणिक घडत असतात. अशीच एक घटना अलिबागमधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजात बीएचएमएसच्या शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत घडली आहे. विशेष म्हणजे प्रेमी हा सीए असल्याची बतावणी करीत असून मुळात एका कपड्याच्या दुकानात काम करीत असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पीडित विद्यार्थिनी ही कांदिवली येथील राहिवासी असून अलिबाग मधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये बीएचएमएस पदवीच्या शेवटच्या वर्षाला ती शिक्षण घेत आहे. तर, फिर्यादी विद्यार्थिनीला फसविणारा आरोपी तरुण हा सुद्धा चारकोप, कांदिवली येथे राहतो. ४ वर्षांपूर्वी पीडित विद्यार्थिनी आणि आरोपीची १ ऑक्टोबर २०१७ पासून फेसबुकवर मैत्री झाली. आरोपीने आपण सीए असल्याचे पीडित विद्यार्थिनीस सांगितले होते. त्यानंतर मैत्री होऊन त्यांचे प्रेमही जुळले. यानंतर ४ वर्षे आरोपीने फिर्यादी विद्यार्थिनीला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आरोपी हा अलिबाग येथे येऊन पीडित तरुणीला भेटतही होता.