रायगड -कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला 5 पॅरामिटर असलेले मॉनिटर आणि 2 ऑक्सिजन कंसंट्रेटर भेट देण्यात आले आहेत. तसेच खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयालाही 2 ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्यात आले आहेत. रुग्णांना याचा लाभ होणार असल्याने सर्वानी समाधान व्यक्त केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सहकार्याने आणि मावळ मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून हे ऑक्सिजन कंसंट्रेटर भेट देण्यात आले आहेत.
कर्जत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात 70 रुग्ण कोरोनामुक्त
कर्जत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या प्रकारची रुग्णसेवा दिली जात आहे. या रुग्णालयाला 5 पॅरामिटर असलेले मॉनिटर आवश्यक होते. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीची कमतरता जाणवत होती. त्यासाठी खासदार बारणे यांनी पुढाकार घेतला. खासदार बारणे यांच्या हस्ते रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडे 5 पॅरामिटर असलेले दोन मॉनिटर आणि दोन ऑक्सिजन कंसंट्रेटर सुपूर्द करण्यात आले. कर्जत उपजिल्हा रुग्णालय ५० बेडचे आहे. ऑक्सिजन पाइपलाइनही आहे. कोरोना काळात येथे ७०हून अधिक रुग्ण चांगले उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत.