रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिद्दी जोहरला शह देण्यासाठी बांधलेला पद्मदुर्ग किल्याच्या जागर कार्यक्रम 22 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. कोरोना संकट असल्याने यावेळेला मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पद्मदुर्ग जागर कार्यक्रम साजरा केला जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अशिलकुमार ठाकूर यांनी दिली. पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीमार्फत किल्ल्यावर जागर, शिवकालीन खेळ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरतेबाबत पोवाडा असा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो.
पद्मदुर्ग जागर यावर्षी साधेपणाने -
कोरोना प्रादुर्भाव असल्याने पद्मदुर्ग जागर कार्यक्रम यावेळी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. 100 व्यक्तीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. मुरुड शहरातील राधाकृष्ण मंदीर येथून महाराजांची पालखी बोटी मधून किल्ल्यात जाणार आहे. तिथे पोहचताच कोटेश्वरी मातेचेचे मूळ स्थान असलेल्या ठिकाणी कोटेशवरी मातेची ओटी व पूजन करून पालखी किल्ल्यात प्रवेश करेल. किल्ल्यात पालखीचा प्रवेश होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक केला जाईल. अभिषेक संपन्न होताच महाराजांची आरती घेण्यात येणार आहे. अशी जागर कार्यक्रमाची रूपरेषा राहणार आहे.