रायगड - रायगड हा पर्यटन जिल्हा असला तरी वन संपत्तीनेही बहरलेला आहे. वनक्षेत्रातही जिल्ह्यात पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यात इको टुरिझमही मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. असे असले तरी कुठेही वनाची जंगलतोड किंवा औद्योगिकीकरणामुळे पर्यटन विकासाला धोका होत नाही. जंगलतोड, अतिक्रमण, वणवा, अवैध चराई, वन्यजीव याबाबत जिल्ह्यात वनविभागाने 485 गुन्हे वर्षभरात दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लोकप्रिय असलेल्या वनक्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास न होता इको टुरिझम होत आहे.
जिल्ह्यातील वन क्षेत्रफळ 7152 चौ. कि. मी. -
रायगड जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 23% क्षेत्रावर वने आहेत. या वनांमध्ये मुख्यतः साग, चिंच, खैर यांसारखे वृक्ष आढळतात. पनवेल तालुक्यात कर्नाळा येथे पक्षांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. तसेच फणसाड येथील अभयारण्यही घोषित करण्यात आले आहे. उरण तालुक्यात घारापुरी येथे व कर्जत तालुक्यात माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी वनोद्याने पाहण्यास मिळतात.
कर्नाळा अभयारण्य हे राखीव वनक्षेत्र -
कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. 12.155 चौरस किलोमीटरच्या या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांचे हे माहेरघर आहे. आपण येथे 147 प्रजातींचे पक्षी पाहू शकतो. त्यात 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, उझबेकिस्तान, सैबेरियातून पक्षी येथे येतात. मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात कर्नाळा अभयारण्याचा काही भाग विस्थापित झाला असला तरी अभयारण्याला कोणताही धोका नाही.
फणसाड अभयारण्य इको टुरिझम म्हणून विकसित -
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य हे सुद्धा एक इको टुरिझम म्हणून प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात पक्षाच्या 164 प्रजाती, 17 प्राणी, 27 साप, 90 विविध फुलपाखरे, 718 विविध जातींची झाडे आहेत. फणसाड अभयारण्यात राहण्यासाठी वन विभागाकडून टेंट पद्धतीने सुविधा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यात राहण्यासह पक्षी, प्राणी पाहण्याचा आनंद लुटता येत आहे.