रायगड - कोरोना महामारी संकट हे देशात घोंघावत असताना आरोग्य यंत्रणा या युद्धात आपला जीव ओतून काम करत आहेत. कोरोनाच्या काळात डॉक्टर हे कोरोना रुग्णाच्या सेवेत अहोरात्र सेवा देत आहेत. जिल्ह्यातही कोरोना संकट गडद झाले असताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आपले कर्तव्य बजावत आहेत. आज जागतिक 'डॉक्टर्स डे'च्या निमित्ताने कोरोना विभागाचे नोडल अधिकारी डॉ. विक्रमजीत पाडोळे हे कोरोना काळात कशाप्रकारे सेवा देत आहेत, हे जाणून घेऊया...
कोरोना काळात रुग्णसेवा करताना आलेला अनुभव सांगताना डॉ. विक्रमजीत पाडोळे डॉ. विक्रमजीत पाडोळे हे चिकीत्सक असून जिल्हा सामान्य रुग्णालयात 2017 पासून कार्यरत आहेत. राज्यात कोरोना महामारीने डोके वर काढल्यानंतर जिल्ह्यातही कोरोना विभाग स्थापन करण्यात आला. या विभागाचे नोडल अधिकारी म्हणून ते गेल्या तीन महिन्यापासून कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. जिल्ह्यात आधी कोरोनाची लागण झाली नव्हती. मात्र, मुंबई, उपनगरामधून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा जिल्ह्यातही शिरकाव होण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाने तीन हजाराचा आकडा गाठला आहे. मात्र, असे असले तरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही रुग्णाच्या सेवेत अहोरात्र काम करत आहे.
डॉ. पाडोळे हे कोरोना विभाग सुरू झाल्यापासून या विभागात कार्यरत आहेत. आतापर्यंत अडीचशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले. त्यांनी त्यांच्यावर उपचार केले असून रुग्णांना धीरही दिला आहे. कोरोनासारखा आजार हा आपल्यालाही होऊ शकतो, ही भीती मनात आहे. मात्र, रुग्णसेवेचे घेतलेले व्रत ते आजही पार पाडत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाबत जनजागृती तसेच गंभीर आजारात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक यांनी आपली काळजी कशी घ्यावी? याबाबत डॉ. पाडोळे यांनी मार्गदर्शनही केले आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात २४ तास असल्याने कोरोनाची बाधा होऊन कुटुंबालाही याची लागण होऊ शकते, अशी अनामिक भीतीही त्याच्या मनात असते. मात्र, कुटुंबानेही या काळात सहकार्य केले असून रुग्णाची सेवा हीच आमची काळजी, असे कुटुंबाचे म्हणणे असल्याचे डॉ. विक्रमजीत पाडोळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
आज कोरोना संकट सगळीकडे असताना आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर यांचा प्रत्यक्ष कोरोना रुग्णांशी संपर्क येत आहे. त्यातून अनेक डॉक्टरांना या रोगाची बाधा झाली आहे. मात्र, असे असले तरी डॉ. विक्रमजीत पाडोळेसारखे डॉक्टर आजही आपले असलेले कर्तव्य संकटकाळातही बजावत आहेत.