मसालाकिंग डॉ. धनंजय दातार कोझिकोड विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना करणार मदत - रायगड लेटेस्ट न्यूज
कोझिकोड येथील विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत म्हणून मसालाकिंग डॉ. धनंजय दातार २० लाख रुपयांचा निधी देणार आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानाचे वैमानिक कॅप्टन दीपक साठे हे भारतीय हवाई दलाचे उत्कृष्ठ कामगिरी बजावलेले अधिकारी होते, असे दातार यांनी म्हटले.
रायगड -एअर इंडियाचे दुबईहून आलेले विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्युमुखी पडले. या मृतांच्या वारसांना वैयक्तिक मदत म्हणून अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी त्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
“दुर्घटनाग्रस्त विमानाचे सारथ्य भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेऊन एअर इंडियात आलेले, अत्यंत अनुभवी व निष्णांत वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे करत होते. ते भारतीय हवाईदलाचे उत्कृष्ट व गौरवपूर्ण कामगिरी बजावलेले अधिकारी होते. माझे दिवंगत वडील महादेव दातार हे सुद्धा भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी होते. त्यामुळे मला या दलाविषयी प्रबळ आत्मीयता आहे. या विमान अपघाताची बातमी ऐकली त्याक्षणी त्यातील मृतांसाठी स्वतःहून काही मदत करण्याची उर्मी मनात दाटून आली.”असे डॉ. धनंजय दातार म्हणाले.
“एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानात अनेक प्रवासी असे होते, ज्यांनी परदेशातील त्यांचे रोजगार गमावले होते. अनेकजण व्हिजिट व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अनेकांपुढे आर्थिक विवंचना होत्या. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांवरील किमान आर्थिक दडपण काहीसे हलके व्हावे, म्हणून वैयक्तिकरित्या हा पुढाकार घेतला आहे," असे डॉ.दातार यांनी सांगितले. गेलेला जीव परत येणार नाही याचे दुःख आहेच, पण या आर्थिक मदतीमुळे किमान मृतांच्या कुटुंबांना अडचणींवर मात करण्यात मदत तरी होईल. एअर इंडियाच्या आपत्ती व्यवस्थापन संघाशी थेट समन्वय साधून ही मदत अखंड स्वरुपात योग्य व गरजू लोकांच्या हाती पडेल, यासाठी प्रयत्न करत आहे. नेहमीप्रमाणेच भारतीय कॉन्सुलेटचा या मोहिमेसाठीही पाठिंबा मिळत आहे, असेही डॉ. दातार म्हणाले.
डॉ. दातार हे सध्या आणखी एका सामाजिक मदत उपक्रम चालवत आहेत. कोविड १९ साथीमुळे अरब देशांत अडकून पडलेल्या गरजू व निर्धन भारतीयांना मायदेशी सुखरुप पोहोचवण्यासाठी ते आर्थिक मदत करत आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३८०० हून अधिक भारतीयांना घरी सुरक्षित पोहोचवले आहे. या उपक्रमाची आखाती प्रदेशातील भारतीय समुदायाकडून प्रशंसा होत आहे. गरजू भारतीय कामगारांच्या मोफत विमान तिकीटाचा व मोफत वैद्यकीय चाचणीचा खर्च डॉ. दातार उचलत आहेत.