रायगड- आज पहिला श्रावणी सोमवार असून त्यासोबत नागपंचमी हा सण आला असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. त्यामुळे भाविकांनी अलिबागमधील काशी विश्वेश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. मंदिराशेजारी दुर्वा, फुले, बेल याची दुकानंही स्थानिकांनी थाटली होती. सकाळपासूनच शंकराच्या देवळात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली झाली आहे.
अलिबाग शहरातील आंग्रेकालीन पुरातन मंदिर कौलारू स्वरुपाचे असून शहराच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराची सुंदर पिंडी आहे. पहाटेपासून मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी झाली होती. आज श्रावणातील पहिला सोमवार असून शंकराला बेल, दुर्वा, दूध याबरोबर तांदळाची मूठ अर्पण केली जाते. त्यामुळे भाविकांची शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी लगबग सुरू झाली होती.