रायगड- आपले वस्तीस्थान सोडून मनुष्यवस्तीत शिरलेल्या मगरीला रविवारी रात्री यशस्वीरीत्या पकडून सिस्केप सदस्यांनी मगरीला मूळ वस्तीस्थानात सोडले आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे जवळील 'माहेर' हॉटेलमध्ये ही नर जातीची मगर स्वसंरक्षणार्थ शिरली होती. माणगाव वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मगर पकडण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अडचणीत आलेल्या वन्यजीवांच्या रेस्क्यूसाठी प्रशासनाने स्वतंत्र पास सिस्केप सदस्यांना वितरीत केले होते.
हॉटेलमध्ये शिरलेल्या मगरीला 'सिस्केप'ने दिले जीवदान - मगरीला जीवदान
माणगांव वन विभागाकडून 3 मे 2020 रोजी रात्री 11 वाजता मगर वस्तीमध्ये आली आहे, असा निरोप सिस्केप संस्थेच्या योगेश गुरव यांना मिळाला. त्यावेळी तातडीने सिस्केप संस्थेचे सदस्य अक्षय भवरे, योगेश गुरव, चिंतन वैष्णव, ओम शिंदे, प्रणव कुलकर्णी, चिराग मेथा घटनास्थळी पोहोचले.
याबबात अधिक माहिती अशी की, माणगांव वन विभागाकडून 3 मे 2020 रोजी रात्री 11 वाजता मगर वस्ती मध्ये आली आहे, असा निरोप सिस्केप संस्थेच्या योगेश गुरव यांना मिळाला. त्यावेळी तातडीने सिस्केप संस्थेचे सदस्य अक्षय भवरे, योगेश गुरव, चिंतन वैष्णव, ओम शिंदे, प्रणव कुलकर्णी, चिराग मेथा घटनास्थळी पोहोचले. तेव्हा मगर एका घराच्या जिन्याखाली एका लोखंडी दरवाजामागे येऊन बसलेली होती. मोठ्या शिताफीने सिस्केप संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने त्या मगरीला सुरक्षित पकडले. त्यानंतर मगरींच्या मूळ अधिवसात त्या नर जातीच्या मगरीला सोडण्यात आले.
नर जातीची मगर 5 फूट लांब होती. यावेळी तिथे असलेल्या स्थानिक लोकांना मगरी विषयी माहीती देताना सिस्केप सदस्य प्रणव कुलकर्णी यांनी सांगितले की, मोठ्या आकाराचे नर-मगर त्यांच्या स्वयंघोषीत क्षेत्रात येणाऱ्या छोट्या मगरींना पळवून लावतात. मग अशा मगरी थोडया काळासाठी त्यांना सुरक्षित वाटणाऱ्या जागा शोधत असतात. तळी, डबके, शेत तळे अशा छोटया पाण्याच्या जागा ते शोधतात. काल ज्या ठिकाणी ही मगर आली होती तिथे आसपास सुद्धा एक तळे होते. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन व जनजागृती सिस्केप संस्था व माणगाव वनक्षेत्रपाल प्रदीप पाटील यांनी केली. यावेळी वनरक्षक आदिनाथ कंठाळे, विशाल जाधव व ग्रामस्थ रामलाल जाधव उपस्थित होते.