रायगड(पेण) - कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाकडे पैसे नसल्याने दोन दिवस त्याची चाचणी न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पेण उपजिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला. अखेर पेणमधील पत्रकार आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना चाचणी करण्यासाठी आवश्यक पैशांची सोय केल्यानंतर या संशयित रुग्णाची चाचणी करण्यासाठी सोमवारी पनवेलला नेण्यात आले.
पेण शहरातील देव आळी परिसरात शनिवारी एक रुग्ण कोरोना संशयित रुग्ण आढळून आला. या रुग्णाला पेण नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी आणि उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन घेतले. मात्र, या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीही यंत्रणा रुग्णालयात उपलब्ध नाही. या संशयित रुग्णाची शासनाने नेमून दिलेल्या रक्त तपासणी केंद्राकडे चाचणी करण्यासाठी साडेसहा हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, या रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने चाचणीसाठी आवश्यक असणारी रक्कम उपलब्ध नसल्याने शनिवार व रविवार असे दोन दिवस पेण उपजिल्हा रुग्णालयात त्याला ताटकळत रहावे लागले.
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी देश पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. देशात लॉकडाऊन आणि संचार बंदी देखील लागू करण्यात आली आहे. पेण तालुक्यात कोरोनाच्या संशयित रूग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी उंबर्डे येथील रेस्ट हाऊस आणि सावरसई येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जे.एस.डब्ल्यू.स्टील कंपनीच्यावतीने पेण उपजिल्हा रुग्णालयात पन्नास खाटांचा विलगिकरण कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने गरीब रुग्णांची ससेहोलपट होत असल्याचे दिसून येत आहे.
शासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. मात्र, संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी आवश्यक रक्कम जमा करावी ज्याचा फायदा सर्वसामान्य गरीब रुग्णांना भेटेल. रुग्णांच्या चाचणीसाठी पैसे लागत असल्याने अनेक रुग्ण हे स्वतःहून पुढे येत नाहीत. गरीब रुग्णांच्या तपासणीसाठी शासनाने मोफत व्यवस्था करावी, असे मत सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे यांनी व्यक्त केले.
पेण येथील संशयित रुग्णात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती मात्र, खात्री करण्यासाठी त्याला पनवेल येथे पाठवण्यात आले आहे. कोरोनाची तपासणी कस्तुरबा रुग्णालयात मोफत होते, अशी माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुडलवाड यांनी दिली.