रायगड -दिवसेंदिवस रायगड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. असे असले तरी बरे होण्याचे प्रमाण 62 टक्के असून 6 हजार 500 रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 3 हजार 733 रुग्ण उपचार घेत असून यातील 2 हजार 100 रुग्ण हे घरी राहून उपचार घेत आहेत.
रायगड : सौम्य लक्षणं असलेले कोरोना रुग्ण घरात राहूनच होताहेत लवकर बरे
दिवसेंदिवस रायगड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. असे असले तरी बरे होण्याचे प्रमाण 62 टक्के असून 6 हजार 500 रुग्ण बरे झाले आहेत.
आनंदाची बाब म्हणजे कमी लक्षणे असणाऱ्या आणि घरी उपचार घेणाऱ्यांमध्ये बरे होण्याचे प्रमाण हे जास्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाण हे चांगले असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
कोरोना प्रादुर्भाव हा जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढू लागला आहे. रोज जिल्ह्यात तीनशेहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात अस्वछता, खाण्यापिण्याची गैरसोय या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे घरी राहून उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ज्यांना सौम्य कोरोना लक्षणे आहेत, असे बाधीत रुग्ण हे घरी राहूनच उपचार घेत आहेत. घरातील आपल्या कुटूंबात राहून प्रसन्न वातावरणामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तर ज्यांना ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची गरज आहे अशा रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घरी राहून उपचार घेत असतानाही फिजीकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. शासनाचे जे नियम दिले आहेत ते पाळूनच या आजारावर मात करणे शक्य होत आहे. मात्र, सध्या तरी घरी उपचार घेणारे रुग्ण या नियमांचे पालन करीत असून, लवकर बरेही होत आहेत हे विशेष.
बरे झालेले आणि पॉझिटिव्ह बाधितांशी प्रेमाने वागा - जिल्हाधिकारी
कोरोना पॉझिटिव्ह झालेले रुग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर त्याच्या कुटूंबात पुन्हा मिसळतात. मात्र, शेजारी, पाजारी, नागरिक हे बरे झालेल्या बाधितांशी फारकत घेऊन वागत असतात. तसेच पॉझिटिव्ह रुग्ण हा घरी उपचार घेत असतानाही बाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण असते. नागरिकांनी ही भीती मनातून काढून बरे झालेल्या रुग्णांशी प्रेमाने वागा असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.