रायगड- निसर्ग चक्रीवादळाच्या रुपाने झालेल्या नुकसानीच्या संकटाला जिल्हा प्रशासन तोंड देत आहे. दुसरीकडे कोरोनाचे संकटही जिल्ह्यात गडद होताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे कोरोना विषाणूच्या प्रसाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन हजारांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पनवेलमध्ये सोबत इतर तालुक्यातही कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 2 हजार पार झाली असून 1495 जणांनी कोरोनवर मात केली आहे. आतापर्यंत 94 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या रायगड जिल्ह्यात 549 जणांवर उपचार सुरू आहेत. दहा दिवसांपूर्वी पनवेल वगळता इतर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा ग्रामीण रायगडात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.