पनवेल- महापालिकेकडून नागरिकांना टँकरद्वारे पुरविण्यात येत असलेल्या पाण्यावर आता चक्क टँकर मालकांकडूनच उघडपणे डल्ला मारला जात आहे. पाण्याचा टँकर ज्या सोसायटीसाठी निघाला तिथे न पोहोचता तो टँकर गाडी धुणाऱ्या सर्व्हिस सेंटरमध्ये रिकामा करताना रंगेहाथ पकडण्यात आले. महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा मोठा फटका या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
पनवेलमध्ये टँकर मालकाकडूनच खुलेआम पाणीचोरी उन्हाळ्याचे चार महिने पाणीटंचाईत काढल्यानंतर पनवेलकरांना पाण्याच्या टंचाईचे चटके पावसाळ्यातही सहन करावे लागत आहेत. एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे पालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करणारे टँकरमालकच आता पनवेलकरांच्या तोंडचे पाणी पळवू लागले आहेत. पनवेलकरांना पाण्याचा तुटवडा होऊ नये, म्हणून डिंगोरकर वॉटर सप्लाय टान्सपोर्टर या कंपनीला कंत्राट देण्यात आले. मात्र, हौदावरून पाणी भरून हे टँकर सोसायटीमध्ये पाणी पुरवठा न करता थेट हॉटेल आणि सर्व्हिस सेंटरमध्ये पोहोचवित असल्याचा धक्कादायक प्रकार नागरिकांनी उघडकीस आणला.
जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेविका सारिका भगत यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पनवेल महापालिका हौदावरून एम.एच.०६ ए.सि.१६४९ हा टँकर दुपारी १२.३० ते १.०० च्या दरम्यान पाण्याने भरून पनवेल महापालिका कार्यालयाला पाणी पुरवठा करण्यास गेला असल्याची नोंद पनवेल महापालिका हौदावर झाली. तिथून हा टँकर निघाला असता तो महापालिका कार्यालयात न जाता चक्क एका सर्व्हिस सेंटरवर खाली होत होता. एकीकडे पनवेलच्या जनतेला प्यायला पाणी मिळत नाही तर दुसरीकडे पिण्याचे पाणी चक्क सर्व्हिस सेंटरला गाडी धुण्याच्या कामासाठी वापरले जात आहे. त्यामुळे पनवेलच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यावेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणाचेच फोन स्वीकारले नाही. त्यानंतर उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना संपर्क साधून हा प्रकार उघडकीस आणून दिले. त्यानंतर त्यांनी लागलीच पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी अविनाश पाटील यांना पाठवले. त्यांच्या समोरच टँकर चालकाने आपण गाडी पनवेल महापालिकेच्या हौदावरून भरली. ती महापालिका कार्यालयात न टाकता शेठने सर्व्हिस सेंटरला टाकायला सांगितली. म्हणून त्याठिकाणी खाली केला, अशी कबुली दिली. त्यामुळे पनवेल महापालिकेने महापालिकेचे पाणी चोरणाऱ्या ठेकेदारावर शासकीय मालमतेचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा व तत्काळ त्याचा ठेका रद्द करावा, अशी मागणी पनवेलचे सुज्ञ नागरिक करीत आहे.