रायगड- महाड सावित्री पूल दुर्घटनेला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने एसटी आगार महाडतर्फे एसटी बसमधील मृत प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामुळे 2 ऑगस्टच्या त्या काळरात्रीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
2 ऑगस्ट 2016 रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अशातच महाड सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल तुटून वाहून गेला. काळोख्या रात्री पूल तुटल्याची किंचितही माहिती या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना नव्हती. अशात कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या दोन एसटी बस व एक स्कॉर्पियो कार या पुलावरून खाली नदीत पडल्या. त्यामधील 28 जणांना जलसमाधी मिळाली. सावित्री नदी किनारी असलेल्या एका टायर दुरुस्ती दुकानदाराला पूल वाहून गेल्याचे दिसले. त्यानंतर त्याने प्रसंगावधान दाखवून मागून येणाऱ्या वाहनांना थांबविले. त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला. मात्र तोपर्यत दोन एसटी बस व स्कॉर्पियो मधील प्रवाशांना आपले प्राण गमावले होते.