रायगड- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रमाधाम वृद्धाश्रमामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच भेट देऊन वृद्धांची आस्थेने चौकशी केली. त्यावेळी नागपूरहून आणलेली संत्रा मिठाई वृद्धांना भेट देऊन त्यांचे तोंड गोड केले. त्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी रमाधाम वृद्धाश्रमाच्या नवीन इमारतीचे बांधकाम व पूर्णत्वास आलेल्या कामाची पाहणी केली. या कामावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त करत आगामी काही दिवसात ह्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचे भव्य उद्घाटन करून वृध्दांच्या सेवेत हजर होईल, असे सूतोवाच त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी वृद्धाश्रमास भेट देत वाटली नागपूरची संत्रामिठाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत रमाधाम वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंदू मामा वैद्य, माजी मंत्री विद्यमान आमदार रवींद्र वायकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे यांसह आदी उपस्थित होते.
यापूर्वीही पक्षप्रमुख असताना उद्धव ठाकरे हे रमाधाम येथे वारंवार येत असत व आश्रमाच्या नवीन वास्तुची पाहणी करत होते. पण, मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच येत असल्यामुळे ठाकरे यांनी आश्रमातील वृद्धांना खास नागपूरची संत्रामिठाई आणली होती. ती स्वतः त्यांनी आजी आजोबांना खाऊ घातली, मुख्यमंत्री येत असल्यामुळे खोपोलीत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री दिवंगत मीनाताई ठाकरे यांनी त्याकाळी सुरू केलेले हे वृद्धाश्रम असल्याने उद्धव ठाकरे यांचे या वृद्धाश्रमावर विशेष प्रेम आहे. येथे वृद्धांसाठी असलेली जूनी वास्तू पाडून एक नवीन वास्तू निर्माण करण्याचे काम गेल्या 5 वर्षांपासून सुरू असून ते आता पूर्णत्वास आले आहे. त्याची अंतिम पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज खोपोलीत आले होते.
हेही वाचा - रायगड रोप-वे : जिल्हाधिकाऱ्यांची कंपनीला नोटीस, किल्ल्यावरील विनापरवाना कामाबद्दल मागितला खुलासा