रायगड - असाध्य ते साध्य करीता सायास'..या उक्तीस अनुसरून ज्या मुलास लहानपणी बोलता येत नव्हते, हात पायात पीळ होणे, डोळे तिरळे होणे, बसता येण्याची सुतराम शक्यता नव्हती. अशी बहुविकलांगपणाची लक्षणे असलेल्या "सेरेब्रल पाल्सी' या असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा शाळेतील कुमार ऋषिकेश शितल सुदाम माळी या विद्यार्थ्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत सेमी इंग्रजी माध्यमात ८६.६० टक्के गुण मिळवत उत्तुंग यश प्राप्त केले. तसेच दिव्यांग प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवला.
विविध समस्यांमुळे ऋषिकेश अधून मधूनच शाळेत जात असे. तसेच त्याला पूर्ण वेळ शाळा कधीच करता आली नाही. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील शाळेतील शिक्षक व प्राचार्य बी.एन. माळी यांना दिले. तसेच शाळेचे चेअरमन समीर बनकर यांनी त्याला वेळोवेळी केलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याबद्दल ऋषिकेशने त्यांचे विशेष आभार मानले.
९ वी परीक्षेनंतर १० वी पाठ्यपुस्तकांचे सखोल वाचन, लोकसत्ता मधील "यशस्वी भव' या सदराचा नियमित अभ्यासात वापर, विविध यु ट्युब चॅनेलवरील मार्गदर्शन, तसेच पाष्टी शाळेतील सर्व शिक्षकांचे घरी मिळणारे मार्गदर्शन व शेवटी बाल भारती व नवनीतच्या प्रश्नपत्रिकांचा सराव यामुळे परीक्षेत यश मिळवणे सोपे झाल्याचे ऋषीकेशने सांगितले.