रायगड- घरातून बेपत्ता झालेल्या ४ वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह शिळफाटा परिसरातील झुडुपात टाकल्याची घटना मंगळवारी खोपोलीमध्ये घडली होती. या चिमुरडीच्या हत्येचा तपास खोपोली पोलिसांनी २४ तासाच्या आत लावला असून एका संशयित आरोपीस अटक केल्याचे पोलीस उपाधीक्षक रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
'त्या' चिमुरडीच्या मृतदेहाचे तुकडे करणारा आरोपी २४ तासात गजाआड - girl killed
हत्येचा तपास खोपोली पोलिसांनी २४ तासांच्या आत लावला असून एका संशयित आरोपीस अटक केल्याचे पोलीस उपाधीक्षक रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना शिळफाटा परिसरातील पटेल नगर येथील आडवाटेच्या झुडुपात या चिमुरडीच्या मृतदेहाचे दोन तुकडे आढळून आले होते. चिमुरडीचे धड आणि शीर वेगवेगळे करुन झाडीत फेकण्यात आले होते. या मुलीच्या शरीरावर चटके दिल्याच्या अनेक खुणा पोलिसांना आढळून आल्या. यावरुन तिचा नरबळी देण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच तिची अवस्था बघून तिच्यावर बलात्कार झाल्याचाही संशय पोलिसांना होता.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेगाजे यांनी अज्ञात आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार केले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता, २४ तासात हत्या करणाऱ्या नराधमास अटक करण्यात यश मिळविले आहे. सदर आरोपी हा चिमुकलीच्या आईकडे घरी येत असल्याचे समजते. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असल्याची माहिती मिळत आहे. आरोपीने गुन्हा कबुल केला असून याबाबत पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.