रायगड- बैलगाडी शर्यतींवर शासनाने राज्यात बंदी आणल्याने बैलगाडी प्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे. तर बैलगाड्यांच्या सरावावरदेखील पोलीसांनी बंधन घातले आहे. पोलीस बैलगाड्या जुंपू देत नाहीत, त्यामुळे गाडीवान संतप्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे आता बैलगाडी संघटनेने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अलिबाग येथे झालेल्या बैठकीत संघटनेने हा निर्णय घेतला.
बैलगाडी संघटनेचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार - रायगड
लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत त्यामुळे आता बैलगाडी संघटनेने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अलिबाग येथे झालेल्या बैठकीत संघटनेने हा निर्णय घेतला.
जिल्ह्यात बैलगाड्यांच्या शर्यतींना एक वेगळीच प्रसिद्धी होती. बैलगाडी शर्यत बघणारे लोक स्पर्धेच्या ठिकाणी गर्दी करत असत. अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, महाड, मुरुड या ठिकाणी बैलगाडी शर्यती भरविल्या जात होत्या. मात्र, काही वर्षांपासून या बैलगाडी शर्यतीवर शासनाने बंदी आणली आहे. त्यामुळे बैलगाडी शौकिन नाराज झाले आहेत. या शर्यती सुरू करण्यासाठी शासन दरबारी खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र, यामध्ये संघटनेला यश आले नाही.
अलिबाग येथे झालेल्या गाडीवान संघटनांच्या बैठकीत याचा निषेध करण्यात आला आहे. कोणताही लोकप्रतिनिधा या प्रकरणात लक्ष घालत नसल्याने नाराजीचा सूर या बैठकीत उमटला आहे. लोक प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत या बैठकीत विचार करण्यात आला आहे. यावेळी ४०० हून अधिक गाडीवान आणि बैलगाडी शर्यतींचे शौकीन उपस्थित होते.