रायगड - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या उमरठ येथील स्मारक दुर्लक्षित आणि अस्वच्छ आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. जिल्हा प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत स्मारकाचे सुशोभीकरण, रंगरंगोटी केली आहे. तर समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 17 फेब्रुवारीला नरवीर तान्हाजी मालुसरे यांची 350वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने समाधीस्थळाच्या जीर्णोद्धार कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे.
तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर नुकताच 'तान्हाजी - द अनसंग वॉरीयर' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यानंतर पोलादपूर तालुक्यातील नरवीर मालुसरे यांची कर्मभूमी असलेले उमरठ हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र, उमरठ येथील तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि तान्हाजी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढल्याने प्रशासनाला जाग आली. त्यानंतर स्मारकाचे सुशोभीकरण आणि रंगरंगोटीची कामे करण्यात आली.