ग्रामपंचायतींनी वीज बिले न भरल्याने गावात 'ब्लॅक आऊट', महावितरणकडून 1,090 कनेक्शन खंडीत - रायगडमध्ये ब्लॅक आऊट
वीज ग्राहकांनी वीज बिले भरली नसल्याने कनेक्शन तोडली जात आहेत. आता जिल्ह्यातील 816 ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून वीज कर घेत असतानाही रस्त्यावरील विजेचे बिल भरले नसल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडले आहे.
रायगड -वीज ग्राहकांनी वीज बिले भरली नसल्याने कनेक्शन तोडली जात आहेत. आता जिल्ह्यातील 816 ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून वीज कर घेत असतानाही रस्त्यावरील विजेचे बिल भरले नसल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जिल्ह्यातील अनेक गावे ही अंधारात लोटली आहेत. 816 ग्रामपंचायतीत 2754 वीज कनेक्शन असून यापैकी 1090 कनेक्शन महावितरणने तात्पुरती तोडली आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून 149 कोटी रुपये महावितरणची वीज बिलपोटी थकबाकी शिल्लक आहे, अशी माहिती रायगडचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी दिली आहे.
ग्रामपंचायतीची 1,090 वीज कनेक्शन तोडली -
कोरोनामुळे महावितरणकडून नागरिकांना पाच महिन्यांची एकत्रित बिले देण्यात आली. त्यानंतर झालेल्या निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर त्वरित महावितरणने कामे करून गावतील, शहरातील वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. मात्र नागरिकांनी वीज बिले न भरल्याने महावितरणकडून घरचे वीज कनेक्शन तोडले जाऊ लागले. पण त्याचबरोबर जिल्ह्यातील 816 ग्रामपंचायतींनी अद्याप रस्त्यावरील विजेची 149 कोटींची बिले थकवली आहेत. अखेर महावितरणकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील 1,090 कनेक्शन तोडली आहेत.