रायगड -अलिबाग येथे जिल्हा पोलीस विभागाच्या 'भरोसा सेल' कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. पीडित महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आता भरोसा सेलचा आधार मिळणार आहे. भरोसा सेल हे पीडितांच्या समस्यांचे निराकरण होण्याचे हक्काचे ठिकाण असल्याचे मत पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
'भरोसा सेल' कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते नागपूर आणि पुणे येथे भरोसा सेलची स्थापना झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात 'भरोसा सेल' कक्षाची स्थापना करण्यात आली. महिला, मुले आणि जेष्ठ नागरिक यांच्या समस्यांचे निराकरण एकाच छताखाली व्हावे यासाठी शासनाने भरोसा सेल स्थापन केले आहे. यामुळे पीडितांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा -महाराष्ट्रातील दोघांना कोरोना विषाणूची लागण, देशभरात एकूण ४७ रुग्ण..
या सेलमध्ये पोलीस, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ञ, समुपदेश, विधितज्ञ, संरक्षण अधिकारी आणि पुनर्वसन या सेवांच्या माध्यमातून पीडितांना मदत मिळणार आहे. भरोसा सेल हे आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास खुले राहणार असून 100 हा हेल्प लाईन क्रमांक मदतीसाठी देण्यात आला आहे. भरोसा कक्षात विशेष बालपथक सेवा, जेष्ठ नागरिक कक्ष, बडी कॉप, पोलीस काका यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम, अॅड निला तुळपुळे, डॉ. अमोल भुसारे, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.