रायगड- राज्यात विधानसभा निवडणुक जाहीर झाली आहे. राज्यात एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा फॉर्म्युला ठरला असला तरी शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला मात्र, अद्यापही ठरलेला नाही. युतीबाबत अद्यापही अनिश्चितता असल्यामुळे पनवेलमधील शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली आहे.
'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने पनवेल विधानसभा मतदार संघाचा घेतलेला आढावा भाजप-सेना युती झाली नाही तर पनवेल विधानसभा मतदासंघातून शिवसेनेतील जवळपास सहा इच्छुक उमेदवारांनी बाशिंग बांधले आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे वर्चस्व आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पनवेलमध्ये बरीच मेहनत घेतली होती. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती झाली नाही तर पनवेलमध्ये भाजपच्या समोर शिवसेनेचे उमेदवार उभे करण्यासाठी नुकत्याच सेना भवनात मुलाखती घेण्यात आल्या. यात जिल्हाप्रमुख शिरिष घरत, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे यांचा समावेश आहे.शिरीष घरत हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यावर रायगड उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यांनतर रायगड जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असताना शिरीष घरत यांनी रायगड आणि पनवेल मध्ये शिवसेनेची ताकद वाढवली आहे. त्यामुळे जर भाजप-सेना युती झाली नाही तर पनवेलमधून सेनेतर्फे शिरीष घरत यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पनवेलमधील राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे पाहण्यासाठी युती फिस्कटल्याची किंवा युती झाल्याच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.