पेण (रायगड) - पेणमधील तीन वर्षीय चिमुरडीवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. या घटनेतील आरोपीचे वकिलपत्र घेण्यात बार असोसिएशनने नकार दिला आहे. आरोपीला सहकार्य करु नये, असे आवाहनही रायगड जिल्हा अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रविण ठाकूर यांनी केले आहे. बार असोसिएशनच्या भूमिकेचे पेणच्या जनतेमधून स्वागत होत आहे.
पेण : 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे वकिलपत्र घेण्यास नकार - minor girl rape case
पेणमधील तीन वर्षीय चिमुरडीवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेतील आरोपीचे वकिलपत्र घेण्यात बार असोसिएशनने नकार दिला आहे. बार असोसिएशनच्या भूमिकेचे पेणच्या जनतेमधून स्वागत होत आहे.
पेणमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर सामाजिक संघटनांकडून पेण बंदची हाक देण्यात आली होती. त्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता बार असोसिएशन ही पुढे आली असून बलात्कार करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी आदेश पाटील याला न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या आरोपीला स्वतःची बाजू मांडण्यास वकील मिळणे कठीण झाले आहे.
आरोपीने केलेले कृत्य हे मनुष्यजातीला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे मीच नाही, तर कोणीही वकील वकिलपत्र घेण्यास तयार होणार नाही. समाजात योग्य संदेश जाण्यासाठी यासारख्या राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीसाठी कोणीही वकिलपत्र घेऊ नये असे आवाहन अॅड.प्रविण ठाकूर यांनी केले आहे.