रायगड - जिल्ह्यात रात्री पासून काही भागात पावसाने उसंत घेतली असली तरी नागोठणे, रोहा, सुधागड पाली, महाड, श्रीवर्धन या दक्षिण भागात पाऊस रात्रभर पडत होता. नागोठणेमधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी बाजरात घुसले आहे. तर पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात चार दिवसापांसून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे नदी, नाले तुडूंब वाहण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा काळ या नद्या वाहत असून अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पाणी संथ गतीने बाजारात घुसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागोठणेकरांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्क राहण्यास सांगितले आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसले असल्याने नागरिक दुसरीकडे आश्रयाला गेले आहेत.