रायगड: नाणारनंतर जिल्ह्यातील चणेरा विभागात रत्नागिरीमधील रिफायनरी प्रकल्प येत असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या प्रकल्पाला विरोध नसल्याची माहिती अधिवेशन काळात विधानसभेत दिली होती. याबाबत 40 गावांमधील शेतकरी रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी त्यांनी प्रकल्पाला विरोध दर्शवत रॅली काढली होती.
रायगडातही रिफायनरी प्रकल्पाला मंजूरी नाही ; 40 गावांतील शेतकऱ्यांचा विरोध रत्नागिरीत होणारा रिफायनरी तेलशुद्धीकरण स्थानिकांच्या विरोधामुळे शासनाने रद्द केला. हा रिफायनरी प्रकल्प रायगडात येणार, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला लोकप्रतिनिधींकडून विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प रायगडात नको अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत शेतकऱ्यांनी रॅली काढून आपला विरोध दर्शविला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना न विचारता त्यांचा प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे कसे म्हटले ? असा सवाल तरुण शेतकरी विनय ठाकूर याने विचारला आहे.
कोणता प्रकल्प यावा हे शेतकरी ठरवतील. लोकप्रतिनिधींनी याबाबत काहीही म्हणणे मांडू नये, अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली आहे. 40 गावातील शेतकऱ्यांचा या प्रकल्पास विरोध असून हा प्रकल्प नको असे प्रशांत मिसाळ यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रिफायनरी प्रकल्पाबाबत खोटे बोलत आहेत. या रिफायनरी प्रकल्पामुळे येथे प्रदूषण वाढणार आहे. त्यामुळे प्रदूषणाचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. असे पर्यावरण अभ्यासक डॉ. मंगेश सावंत यांनी आपले मत मांडले आहे.
रोहा, अलिबाग, मुरुड श्रीवर्धन या तालुक्यातील 40 गावांतील शेतकरी आज प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी एकत्र आले होते. रोहा तालुक्यातील पारंग खार येथे राममंदिरात ही बैठक घेण्यात आली होती. यासाठी शेकडो शेतकरी या बैठकीला हजर होते. या बैठकीत रिफायनरी प्रकल्प रायगडात येणार असेल तर त्याला आमचा विरोध राहील अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. या बैठकीला नाणार प्रकल्पाविरोधात लढणारे सदस्य यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.