रायगड -पेण पाली एसटी आणि ट्रॅकचा वाकण येथे समोरासमोर अपघात होऊन यामध्ये 17 कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह 7 प्रवासी जखमी आणि चालक झाले आहेत. या अपघातातील जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून दोन जणांना पनवेल एमजीएम रुग्णालयात तर एकाला अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यांच्या मदतीने जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात पाली येथे कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती.
नागोठणए वाकण पाली मार्गावर एस टी व ट्रकचा अपघात
पेण आगारातून एसटी चालक पोपट खेडकर पाली येथे प्रवासी घेऊन निघाले होते. नागोठणे पाली रोडवर वाकण येथे एसटी आली असता एका वळणावर समोरून येणारा भरधाव ट्रक हा एसटीवर येऊन समोर आदळला. यावेळी एसटी चालक खेडेकर यांनी अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगावर आलेला ट्रक भरधाव असल्याने अपघात टाळणे जमले नाही, असे चालक खेडेकर यांनी सांगितले.
पेण पाली एसटीमध्ये पाली येथे महाविद्यालयात जाणारे विदयार्थी मोठ्या प्रमाणात असल्याने या अपघातात 17 विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर एसटी आणि ट्रक चालक यांच्यासह 7 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, कॉलेजचे प्राचार्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित प्राथमिक उपचारासाठी नागोठणे प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. रेश्मा खाडे या विद्यार्थीनीला आणि ट्रक चालक मुरलीधर देशमुख यांना गंभीर दुखापत झाल्याने पनवेल येथे एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. नितेश सुतार या जखमी प्रवाशाला अलिबाग जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे. इतर जखमींवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या अपघातांनातर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन जखमींना प्राथमिक मदत दिली.
जखमींची नावे -
दत्ताराम मोरे (प्रवासी), राणी माने, भाविका मढवी, गृहती डाकी, कीर्ती चौगुले, प्रज्वल घासे, हेमा पिंगळा, नितेश सुतार (प्रवासी), प्रिया भोईर, पूजा म्हात्रे, जय नावले, त्रिवेणी पाटील, प्रिया गदमळे, रेश्मा खाडे, स्नेहा पाटील, मुरलीधर देशमुख (ट्रक चालक), शशिकांत चौगुले (प्रवासी), हर्षाली बडे, प्राजक्ता डाकी, अंजली जाधव, किरण मांडेर (प्रवासी), साहिल जंगम, हर्षाली मलत, पूजा म्हात्रे ( एसटी वाहक) पोपट खेडकर ( एसटी चालक)