रायगड -अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील लॉजिंगचे वीज बिल कमी करण्यासाठी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने चक्क 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागीतली होती. मागितलेल्या लाचेप्रकरणी पन्नास हजाराचा पहिला हफ्ता स्वीकारताना अलिबाग महावितरणचा अभियंता विशाल बागुल (वय-32) याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. या घटनेनंतर महावितरण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात हेही वाचा - चिखलीत पोलिसांकडून लाखोंचा गुटखा जप्त, एक आरोपी गजाआड तर एक फरार
अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे तक्रारदार यांचे लॅजिंग आहे. तक्रारदार यांनी लॉजिंगसाठी घरगुती वीज मीटरद्वारे वीज घेतली होती. लॉजिंगसाठी व्यवसायिक वीज मीटर घेतले नसल्याने महावितरणने तक्रारदाराला 2 लाख 47 हजारांचा दंड आकारला होता. याबाबत तक्रारदाराने अलिबाग महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता विशाल बागुल यांच्याकडे वरसोलीचा पदभार असल्याने तक्रारदार यांनी बागुल यांची भेट घेतली. त्यावेळी वीज बिल कमी करण्यासाठी बागुल यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 20 हजाराची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी रायगड लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार लाच लुचपत विभागाने सापळा रचला. अलिबाग चेंढरे येथील कार्यालयात लाचेचा पहिला पन्नास हजाराचा हफ्ता स्वीकारताना कनिष्ठ अभियंता विशाल बागुल यांना रंगेहाथ पकडले. संबंधीत कारवाई लाच लुचपतचे उपअधीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साळे, पोलीस कर्मचारी दीपक मोरे, सूरज पाटील, महेश पाटील यांनी केली.
हेही वाचा - नालासोपाऱ्यात पालघर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन, 50 नायजेरियन नागरिक ताब्यात