महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमधील मतदान प्रक्रिया शांततेत;  ६१.८१ टक्के मतदान, यावेळी मतदानाचा टक्का घसरला - raigad shivsena

२०१४ च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला असल्याने याचा फटका कोणाला बसणार हे २३ मे रोजी मतमोजणी वेळी कळणार आहे.

लोकसभा रायगड

By

Published : Apr 24, 2019, 2:02 PM IST

रायगड- रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले असून १६ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. मात्र, २०१४ च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला असल्याने याचा फटका कोणाला बसणार हे २३ मे रोजी मतमोजणी वेळी कळणार आहे.

मतदान यंत्रे जमा करताना कर्मचारी

रायगड मतदारसंघात निवडणुकीत खरी लढत ही महायुतीचे अनंत गीते व आघाडीचे सुनील तटकरे यांच्यात आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदारांनी उस्फूर्तपणे मतदान केले. मात्र, दुपारनंतर उन्हाची झळ वाढल्यानंतर मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. या निवडणुकीत जेष्ठ नागरिकांनीही उस्फुर्तपणे मतदानात सहभाग घेतला होता.

सकाळी सात ते नऊ वाजेपर्यत ७.५१ टक्के, नऊ ते अकरा १७.९७ टक्के, अकरा ते एक ३७.७७ टक्के, एक ते तीन ४५.६१ टक्के, तीन ते पाच ५३.१५ टक्के मतदान पार पडले होते. तर अंतिम आकडेवारीनुसार ६१.८१ टक्के मतदान पार पडले. जिल्ह्यात १६ लाख ५१ हजार ५६० मतदार असून यापैकी १० लाख २० हजार ७९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

रायगड मतदारसंघात एकूण मतदान ६१.८१ टक्के झाले. यात पेण ६५.१७ %, अलिबाग ६४.८९%, श्रीवर्धन ५९.५९%, महाड ५९.२८%, दापोली ६१.७१%, गुहागर ५९.२९% एवढे मतदान विधानसभा निहाय जिल्ह्यात झाले आहे.

काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या तुरळक घटना सोडता मतदान शांततेत पार पडले. जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रावर मतदारासाठी योग्य सुविधा केलेली होती. जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांच्यासाठी प्रशासनाने चोख सुविधा केलेली होती. तर जेष्ठ मतदारांचे स्वागतही प्रशासनाकडून करण्यात आले. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे संबधीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात आले असून अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली येथील स्ट्राँग रूममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात येतील. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details