रायगड - अंबा नदीवरील 400 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक पूल सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. पुराच्या पाण्याचा तडाखा बसल्याने पुलाची दुरावस्था झाली आहे.
अंबा नदीवरील 400 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक पूलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
या पुलाचा वापर रोहा मार्गे नागोठणे शहरात येण्यासाठी होतो. नागोठण्याचा हा ऐतिहासिक पूल १५८० मध्ये काझी अल्लाउद्दीन यांनी निजाम राजवटीमध्ये बांधला होता. चुना आणि अंड्याचे मिश्रण करून बांधलेला हा पूल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे.
हेही वाचा -तुळशीखिंडीत रस्ता खचला, कशेडी घाटाकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद
पूल ऐतिहासिक असल्याने तो पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र, या ऐतिहासिक पुलाकडे ना पुरातत्व खात्याचे लक्ष आहे, ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे.
पुलाचे संरक्षक कठडे फोडून जिओ व अन्य दुरसंचार कंपन्यांनी बेकायदेशीररित्या वजनदार केबल टाकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरात पुलाचे कठडे वाहून गेले. पुलावरून छोटी वाहने व पायी प्रवास करणाऱ्या नागोठणेकरांचा जीव धोक्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न नागोठणेकर करीत आहेत.