रायगड- अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट व कोकेन बाळगल्या प्रकरणी 16 आरोपींना अटक केली होती. यामध्ये पुन्हा चार नायझेरियन आरोपींना स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 260 ग्राम कोकेन जप्त केले असून बाजारात त्याची किंमत 13 लाख रुपये आहे. त्यामुळे या अंमली पदार्थ गुन्ह्याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी, कोडीचीन्मा प्रोमिस यूची आणि ओलुवेदर स्ट्रीट लोगस अशी नायझेरियन आरोपींची नावे आहेत.
गेल्या 28 जूनला अलिबागमधील किहीम परिसरातील चिराणिका फार्म व कनकेश्वर फाटा परिसरातील सक्सेना फार्म येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणात सात पीडित टीव्ही अभिनेत्रींनाही अटक केली होती. यापैकी मुख्य आरोपी राखी नोटानी आणि रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांच्याकडून स्थानिक गुन्हे पथकाने 26 ग्राम कोकेन जप्त केले होते. पोलिसांनी कोकेन कुठून आणले? याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता मुंबई येथून कोकेन घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायझेरियन नागरिकांना आणि हुसैन मुझफफर रझानी, मनिष दौलत टुकरेल, दिपक अर्जुन अगरवाल या 5 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 50 ग्राम कोकेनही जप्त केले होते.