रायगड - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 250वर पोहोचली आहे. काल 10 मे रोजी उरण तालुक्यात 20 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असताना आज पुन्हा 27 नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यात कोरोनाबाधित 56 झाले असून करंजा गावातच 49 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
चिंताजनक : रायगडच्या उरण तालुक्यात आतापर्यंत 56 कोरोनाबाधित; आज 27 नवीन रुग्ण आढळले - रायगड लेटेस्ट न्यूज
उरण तालुक्यात कोरोनाबाधित 56 झाले असून करंजा गावातच 49 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
उरणमध्ये आठ दिवसापर्यंत 4 जण कोरोनाबाधित होते. मात्र, 10 मे रोजी एकाचवेळी 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली होती. एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या 20 जणांना बाधा झाली होती. हे सर्व एकाच मच्छीमार कुटुंबातील आहेत. यामध्ये 12 स्त्री आणि 9 पुरुष रुग्णांचा समावेश होता. तसेच एक वर्षाच्या लहान मुलीसह 6 मुलांनाही लागण झाली होती. या रुग्णांच्या संपर्कात तब्बल 67 जण आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून कालच या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या 33 जणांची काल स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. त्यापैकी 27 जणांची कोरोना टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे, तर उर्वरित 6 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे करंजा गाव हे पूर्णपणे सील करून कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.