रायगड - किल्ले रायगडच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने मंजूर केलेला 20 कोटींचा निधी अखेर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. ईटीव्ही भारतने 'किल्ले रायगडासाठी मंजूर झालेले २० कोटी मिळणार कधी?' अशी बातमी शिवजयंतीच्या दिवशी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर शासनाने वेगात हालचाली करून हा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे.
किल्ले रायगडला मंजूर केलेला 20 कोटी निधी अखेर वितरित महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत किल्ले रायगडसाठी 20 कोटी निधीला मंजुरी दिली होती. मात्र, तीन महिने उलटले तरीही हा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला नव्हता.
हेही वाचा -किल्ले रायगडासाठी मंजूर झालेले २० कोटी मिळणार कधी?
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना याबाबत विचारले असता आठ दिवसात निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 20 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला.
रायगडाला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी किल्ले रायगड विकास प्राधिकरण आराखडा निर्माण करून त्याद्वारे कामे करण्यात येत आहेत. संवर्धन, सुशोभीकरण आणि उत्खननाची कामे सध्या रायगडावर सुरू आहेत. किल्ल्याला जोडणाऱ्या रस्त्याची कामेही सुरू झालेली आहेत. त्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे.