रायगड : रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 1 लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत. 612 जागांसाठी 1588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे.
सर्वच पक्षांनी कसली कंबर..
जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यापैकी 10 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. त्यामुळे प्रत्यक्षात 78 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतले जाणार आहे. शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. आणि त्या जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुका राजकीय पक्षाच्या माध्यमातून लढवल्या जात नसल्या तरी विविध आघाड्यांच्या माध्यमातून सर्वच प्रमुख पक्ष सक्रिय आहेत. तालुकानिहाय राजकीय समीकरणे वेगवेगळी आहेत. काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे तर काही तालुक्यात काँग्रेस शेकापची आघाडी पहायला मिळते.
1 लाख 77 हजार 383 हजार मतदार करणार मतदान..
या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवार 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजेपासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतदारांच्या आकडेवारीची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे:
- अलिबाग- ग्रामपंचायतींची संख्या-4, एकूण मतदार 8 हजार 731.
- पेण- ग्रामपंचायतींची संख्या-7, एकूण मतदार 11 हजार 838.
- पनवेल- ग्रामपंचायतींची संख्या-22, एकूण मतदार 55 हजार 297.
- उरण- ग्रामपंचायतींची संख्या-6, एकूण मतदार 31 हजार 304.
- कर्जत- ग्रामपंचायतींची संख्या-8, एकूण मतदार 20 हजार 594.
- रोहा- ग्रामपंचायतींची संख्या-21, एकूण मतदार 32 हजार 781
- माणगाव- ग्रामपंचायतींची संख्या-2, एकूण मतदार 9 हजार 725.
- महाड- ग्रामपंचायतींची संख्या-3, एकूण मतदार 7 हजार 113.
- श्रीवर्धन- ग्रामपंचायतींची संख्या-3, एकूण मतदार 5 हजार 759.
- म्हसळा- ग्रामपंचायतींची संख्या-2, एकूण मतदार 2 हजार 317.
अशा एकूण 78 ग्रामपंचायतींमध्ये 86 हजार 633 स्त्री मतदार, 90 हजार 748 पुरुष मतदार, इतर 2; असे एकूण 1 लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. तर, मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने येणाऱ्या मतदारांची तापमान आणि ऑक्सिजन तपासणी, सॅनिटायझर देऊन मतदान केंद्रात सोडले जाणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.