पुणे - भारतातील पहिली आणि जगातील तिसरी झिरो एनर्जी शाळा म्हणून शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषदची शाळा आदर्श मॉडेल ठरत आहे. राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही याच शाळेला मिळाला आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेल्या शाळेचे या नाव आहे. मॉडेल म्हणून वाटचाल करत आहे
जिल्हा परिषदेची 'झिरो एनर्जी शाळा' शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले 50 ते 60 घरांचे वाबळेवाडी छोटसे गाव आहे. या गावची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे. दोन गळक्या खोल्या,पडक्या भिंती अशी या गावची सहा वर्षापूर्वीची शाळा होती. याच शाळेत मुले शिक्षणाचे धडे गिरवत होते. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने ही शाळा उभा करत शाळेचा कायापालट केला. आज हीच शाळा जगातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणास्थान बनली आहे.
या शाळेच्या काचेच्या खोल्या पाहून तुम्हाला कदाचित परदेशातल्या एखादे हॉटेल आहे असे वाटते. मात्र, प्रत्यक्षात ही पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर जवळच्या वाबळेवाडी येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. ही देखणी वास्तू साकारण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग आणि बँक ऑफ न्यूयॉर्कची मोलाची मदत झाली आहे. ही शाळा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिली झिरो एनर्जी शाळा ठरली आहे.
जिल्हा परिषदेच्या या शाळेच्या वर्गखोल्या पूर्णतः काचेचे असून 22 फूट रुंद, 22 फूट लांब आणि 24 फूट उंच आहे. या सर्व खोल्या पर्यावरणपूरक आहेत. या वर्ग खोल्यांमध्ये प्रकाशाचे विस्तारीकरण होत आणि हवाही खेळती राहते. शिवाय झिरो एनर्जी खोलीला देखभाल आणि दुरुस्तीची गरज लागत नाही. या ठिकाणी विद्यार्थी नुसते शिकतच नाही तर अभ्यासाबरोबर मुलांच्या सर्वांगीण विकासावरही येथे भर दिला जातो.
या जिल्हा परिषद शाळेमध्ये पुढील दोन वर्षांचे प्रवेश पूर्ण झाले असून चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत. तर दुसरीकडे या शाळेचा दर्जा आणि शिक्षण पद्धती पाहण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून शिक्षक, अधिकारी, पालक शाळेला भेटी देत आहेत. अनेक राज्य सरकारे झिरो एनर्जी स्कूलचे मॉडेल आपल्या राज्यात राबवण्याच्या तयारीत आहे.