महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुकवर पोस्ट टाकून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्राण - पोलीस महानिरिक्षक

पुण्यातील एका तरूणाने स्पर्धा परीक्षेत सतत येणारे अपयश आणि पत्नीच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करणार असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ही पोस्ट राज्य सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती पुणे पोलिसांना दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखत अगदी काही मिनिटात त्या व्यक्तीचा माग काढून त्याचे मनपरिवर्तन केले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.

फेसबुकवर पोस्ट टाकून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : Jun 9, 2019, 11:17 AM IST

पुणे- स्पर्धा परीक्षेत सतत येणारे अपयश आणि पत्नीच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करणार असल्याची पोस्ट पुण्यातील एका तरुणाने फेसबुकवर टाकली होती. ही पोस्ट राज्य सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती पुणे पोलिसांना दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखत अगदी काही मिनिटांत त्या व्यक्तीचा माग काढून त्याचे मनपरिवर्तन केले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी परिसरात राहणारा योगेश (नाव बदललेले) हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. शनिवारी दुपारी त्याने आत्महत्या करणार असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली. ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने पुणे पोलिसांना हा प्रकार कळविला. पुणे पोलिसांनी या तरुणाची अधिक माहिती काढली असता तो हडपसर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि त्यांच्या पथकाला या तरुणाचा मोबाईल क्रमांक आणि फोटो मिळाला. लोकेशनवरून तो हडपसर परिसरातच असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्याला कुंजीरवाडीतून रेल्वे स्थानककाकडे जाताना ताब्यात घेतले.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या योगेशला तीन वर्षांचा मुलगा आहे. मागील काही वर्षांपासून त्याला सतत अपयश येत होते. यामुळे त्याला नैराश्याने ग्रासले होते. कामधंदा काही करत नसल्यामुळे पत्नी आणि सासू त्याला त्रास देत होते. त्यामुळे वैतागलेल्या योगेशने आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली. दरम्यान, पोलिसांनी राजेशचे समुपदेशन केले असल्याचे हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details